ऐतिहासिक माहिती
ग्रामदैवत श्री भावेश्री देवीच्या छत्रछायेखाली नांदणारे व तुळशी नदीकाठी वसलेले सावर्डे दुमाला
हे कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात प्रशासकीय, धार्मिक, कृषी पर्यटन जोपासून सकारात्मक विचार पुढे घेऊन जाणारे गाव म्हणून पंचक्रोशीत नावलौकिक प्राप्त आहे.
गावचे ग्रामदैवत श्री भावेश्री देवीची यात्रा म्हणजे संपूर्ण गावच्या आनंदाला उधाण आणणारा सोहळा.
ही यात्रा अक्षय तितीयेनंतर येणाऱ्या पहिल्या सोमवारी व मंगळवारी अशी दोन दिवस असते.
सावर्डे दुमाला गाव वारकरी संप्रदायाचा पाया असणारे गाव. गावात वारकरी परंपरा चालत आली आहे. मुख्य रस्त्यावर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आहे.
दर्शनाने भक्तीमय वातावरण होत असते. ग्रामदैवत श्री भावेश्वरी मंदिर, दत्त मंदिर, महादेव मंदिर, रामलिंग, हनुमान मंदिर, गैबी देवालय अशा आध्यात्मिक स्थानांमुळे श्रद्धा, पवित्रता व मांगल्याचे वातावरण गावात टिकून आहे.
गावात शेती या मुख्य व्यवसायाबरोबर दुग्ध व्यवसायही भरभराटीला आला आहे. गावात सुमारे १५ दूध संस्था असून हजारो लिटर दूध संकलन सहकारी संस्थांच्या माध्यमातून होत आहे. अनेक युवक व्यवसाय म्हणून यात उतरले आहेत.
ऊस या प्रमुख पिकाबरोबरच आंतरपीक म्हणून भाजीपालाही घेतला जात आहे.
गावात विविध स्पर्धा, उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम यांची रेलचेल असते.
शिव छत्रपतींचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
तसेच महिला मंडळांच्या माध्यमातून महिलाही आपली वेगळी ओळख निर्माण करीत आहेत.
गावात विविध पक्ष असले तरी विकासाच्या बाबतीत सर्वजण एक राहतात, हे एक वैशिष्ट्य.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध विकासकामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.
जय शिवराय व्यायाम तालिम मंडळाच्या वतीने सुरू असलेला ‘एक गाव एक गणपती’ उत्सव २९ व्या वर्षी अखंडित चालू आहे.
ही आदर्श परंपरा जोपासणाऱ्या मंडळ व गावचा जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने विशेष सत्कार करून गौरव करण्यात आला.
सर्वांना आपल्या छत्रछायेखाली घेणाऱ्या ग्रामदैवत श्री भावेश्री देवीचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो.